नवी दिल्ली
केंद्र सरकारने लोकप्रिय मेसेजिंग ॲप्स वापरण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल केला असून, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अरात्ताई आणि जोश यांसारख्या सेवांसाठी नवीन अटी लागू केल्या आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) निर्देश दिले आहेत की, आता ही ॲप्स वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये सक्रिय सिम कार्ड असल्याशिवाय काम करणार नाहीत.
सरकारने स्पष्ट केले आहे की, हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू केले जात आहेत आणि कंपन्यांना ९० दिवसांच्या आत ही नवीन व्यवस्था लागू करावी लागेल, तसेच १२० दिवसांच्या आत याची अनुपालन (Compliance) अहवाल द्यावा लागेल.
दूरसंचार सायबर सुरक्षा (सुधारित) नियम, २०२५ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. या नियमांमुळे पहिल्यांदाच ॲप-आधारित दूरसंचार सेवांना कठोर दूरसंचार नियामक व्यवस्थेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
९० दिवसांत नवी व्यवस्था लागू करण्याची सक्ती
दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे की, या निर्देशांनंतर ९० दिवसांच्या आत, सर्व सेवांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ॲपचा वापर फक्त त्याच सक्रिय सिम कार्डसह केला जाईल, ज्याचा मोबाईल नंबर ग्राहकाच्या ओळखीसाठी वापरला गेला आहे. सक्रिय सिम कार्डशिवाय ॲप चालवणे अशक्य केले जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या