कानपूर, उत्तर प्रदेश
पतीने केलेल्या मारहाणीनंतर पत्नीने त्याला व्हिडिओ कॉल करत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रामालय मोहल्ला भागात घडली आहे. मोना नावाच्या या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मोनाचा पती शुभम दिवाकर याला दारूचे व्यसन होते. बुधवारी संध्याकाळी कामावरून परतल्यावर त्याने पत्नी मोनाकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले. मोनाने पैसे देण्यास नकार दिल्यावर संतापलेल्या शुभमने तिला क्रूरपणे मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो तिच्याकडून पैसे घेऊन दारू पिण्यासाठी घराबाहेर पडला.
व्हिडिओ कॉलवर केली आत्महत्या
पती शुभम घराबाहेर पडल्यानंतर अवघ्या १६ मिनिटांनी रडत असलेल्या मोनाने त्याला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि शुभमसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. मोनाला वाचवण्यासाठी शुभमने तात्काळ घरी धाव घेतली, परंतु घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला. मात्र, तोपर्यंत मोनाचा मृत्यू झाला होता.
प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत
मोना आणि शुभम दिवाकर यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना दोन लहान मुले आहेत. शुभम एका खासगी कंपनीत काम करत होता, तर मोना कुटुंबाला मदत करण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात 'वेलकम गर्ल' म्हणून काम करत होती.
मोनाच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणी पोस्ट मॉर्टम हाऊसबाहेर जमा झाल्या. त्यांनी संतप्त होऊन दिवाकरला घेरले आणि मारहाण केली. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. मोनाच्या मैत्रिणींनी शुभमवर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मोनाचा मोबाईलमधील कॉल हिस्ट्री डिलीट केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
पोलिसांची भूमिका
रावतपूर पोलिसांनी सांगितले की, मोनाच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास, योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, शेजाऱ्यांनी दावा केला आहे की शुभम दारू पिऊन मोनाला वारंवार त्रास देत होता.

0 टिप्पण्या