मुरैना
मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात एका भाजप नेत्याने आपल्या कारने पाच लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका बालकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण रुग्णालयात दाखल आहेत. उपचारादरम्यान रामदत्त राठौर (वय ६५) आणि अर्णव लाक्षाकार (वय १०) या दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत व्यक्ती पोरसा येथील राठौर मोहल्ला बायपास रोड, प्रभाग क्रमांक ३ चे रहिवासी होते. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप होता. संतप्त जमावाने केलेल्या जोरदार आंदोलनानंतर, पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या भाजप नेते दीपेंद्र भदौरिया याला पुन्हा अटक करण्यात आली.
दारूच्या नशेत भरधाव गाडी चालविल्याचा आरोप
भाजप नेता दीपेंद्र भदौरिया भरधाव वेगाने गाडी चालवत होता आणि तो दारूच्या नशेत होता, असा स्थानिकांचा आरोप आहे. अपघात घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी या भाजप नेत्याला पकडून त्याची जोरदार धुलाई केली. मारहाणीत त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. ही घटना पोरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोटई रोड परिसरात घडली.
संतप्त जमावाने नेत्याला मारहाण केली
माहितीनुसार, दीपेंद्र भदौरिया भरधाव वेगाने कार चालवत होता. जोटई रोड बायपास चौकात थंडीपासून वाचण्यासाठी काही लोक शेकोटीजवळ बसून हात शेकत होते. याच वेळी, एमपी ०६ सीए ५१७२ क्रमांकाच्या कारने या लोकांना धडक दिली. संतापलेल्या स्थानिकांनी त्याला जागीच पकडून मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, यानंतर आरोपी दीपेंद्र पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांनीच भाजप नेत्याला पळून जाण्यास मदत केली, असा संतप्त ग्रामस्थांचा आरोप होता.
पोलीस कोठडीतून भाजप नेता पळाला
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भाजप नेत्याने लोकांना धडक दिल्यानंतर थांबण्याऐवजी बेपर्वाईने गाडी चालवणे सुरूच ठेवले. यावेळी त्याच्या कारची रस्त्यावरील आणखी एका गाडीला धडक बसली. धडकेनंतर, घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरोपीचा पाठलाग केला, त्याला पकडले आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला पोरसा पोलिसांच्या हवाली केले. तथापि, तो पोलीस कोठडीतून पळून गेला. लोकांचा रोष लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याला अखेर अटक केली आहे.

0 टिप्पण्या