मुंबई
पुणे-बेंगलुरू महामार्गावर किणी गावाजवळ सोमवारी रात्री एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये धाडसी दरोड्याची घटना समोर आली. मुंबईकडे जाणाऱ्या या बसला शस्त्रांचा धाक दाखवून लुटारूंनी अडीच कोटी रुपयांच्या मालावर हात साफ केला. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या १२ तासांच्या आत या टोळीचा पर्दाफाश केला आणि सात आरोपींना अटक केली आहे.
अशी घडली घटना
सोमवारी रात्री दशरथ शामराव बोबडे यांच्या 'न्यू अंगडिया सर्व्हिस'चा किमती पार्सल घेऊन अशोका ट्रॅव्हल्सची बस कोल्हापूरहून मुंबईसाठी निघाली होती. पार्सलच्या सुरक्षेसाठी मच्छिंद्र नामदेव बोबडे हे देखील बसमध्ये होते. बस तावडे हॉटेलजवळ पोहोचताच तोंडाला रुमाल बांधलेले तीन संशयित प्रवासी बसमध्ये चढले. बस वठार गावाजवळ पोहोचल्यावर या तिघांनी आपले खरे रूप दाखवले.
डिक्कीतून उडवला करोडोंचा माल
या तिन्ही लुटारूंनी थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये प्रवेश केला. लोखंडी रॉडचा धाक दाखवून ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी दिली आणि किणी गावाजवळ जबरदस्तीने बस थांबवली. बस थांबताच दुचाकीवरून त्यांचे आणखी तीन साथीदार तेथे पोहोचले. बसमधील लुटारू आणि बाहेरून आलेल्या साथीदारांनी मिळून बसची डिक्की उघडली आणि तिथे ठेवलेला किमती पार्सल लुटला.
या पार्सलमध्ये खालील वस्तूंचा समावेश होता
- ६० किलो चांदी
- १० ग्रॅम सोने
- १.२५ कोटी रुपयांचे मशीन स्पेयर पार्ट्स
एकूण लुटीच्या मालाची किंमत सुमारे २.५० कोटी रुपये होती.
पोलिसांची सुपरफास्ट कारवाई
या घटनेनंतर घाबरलेल्या ड्रायव्हरने बस किणी टोल बूथपर्यंत नेली आणि पेठ वडगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्वरित कामाला लागले. पोलिसांनी तावडे हॉटेलपासून किणी टोल नाक्यापर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तपासादरम्यान, विक्रमनगर येथील अक्षय कदम याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून त्याला लुटीच्या मालासह पकडले. अक्षयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून टेंबलाई मंदिर परिसरातून टोळीतील उर्वरित सहा सदस्यांनाही अटक केली.

0 टिप्पण्या