बोधेगाव प्रतिनिधी
बोधेगाव येथे बाडगव्हाण रस्त्यालगत असलेल्या खिळे वस्ती व वैद्य वस्तीवर मध्यरात्री सुमारे आठ ते दहा दरोडेखोरांनी शस्त्रांसह घुसखोरी करत भीषण दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी तलवार व चाकूचा धाक दाखवून महिला-पुरुषांना जबर मारहाण केली व रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोधेगाव येथील बाडगव्हाण रस्त्यालगत शेतात वस्तीवर राहणारे कचरू श्रीपती खिळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी अप्पासाहेब कचरू खिळे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून मारहाण करत मोबाईल फोडण्यात आला. घरातील कपाटातून रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास करून दरोडेखोरांनी कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवले.
यानंतर आरडाओरड होताच दरोडेखोरांनी शेजारीच सुमारे २०० फूट अंतरावर राहणारे वडील कचरू श्रीपती खिळे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घराबाहेर झोपलेल्या कचरू खिळे यांना मारहाण करून दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. मुलगा परमेश्वर व मोहन यांच्या गळ्याला चाकू लावून खिळे कुटुंबाला महिलांना जबर मारहाण करण्यात आली. घरातील दोन कपाटे फोडून त्यातील मौल्यवान सोने-चांदीच्या वस्तू, महिलांच्या अंगावरील दागिने व लाखो रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या मारहाणीत सविता खिळे यांच्या कानातील झुंबर ओढून घेतल्याने त्यांचा कान फाटला असून लहान मुलांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
यानंतर दरोडेखोरांनी पांडुरंग वैद्य यांच्या घरावर हल्ला चढवला. दरवाजा तोडून घरात प्रवेश करत पांडुरंग वैद्य व त्यांची पत्नी रुक्मिणी यांना जबर मारहाण करून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने लंपास केले. मदतीसाठी आरडाओरड करत असताना शेजारील नागरिक भीमराव अकोलकर धावून आले असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली, यात ते गंभीर जखमी झाले. पांडुरंग वैद्य यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर दरोडेखोरांनी अंकुश शांतवन खंडागळे यांच्या घरातही प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली.-
पोलिस उशिरा पोहोचले
परमेश्वर खिळे हे कसाबसा दरोडेखोरांच्या तावडीतून पळून बोधेगाव पोलिस दूरक्षेत्रात पोहोचले. मात्र तेथे एकच पोलिस कर्मचारी उपस्थित होता. माहिती दिल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याला कळवण्यात आले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.
अहिल्यानगर येथून श्वान पथक सकाळी दाखल झाले असून त्यांनी माग दाखविला आहे तर पिढीत एका कुटुंबात सीसीटीव्ही कॅमेरात दरोडेखोर कैद झाले आहे त्यादृष्टीने तपास होण्याची गरज आहे
चौकट : पोलिस दूरक्षेत्र बेवारस
बोधेगाव पोलिस दूरक्षेत्रात एक पोलिस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी नियुक्त असतानाही त्यांना शेवगाव येथे ड्युटीवर पाठवले जात असल्याने बोधेगाव येथे अनेकदा एकही कर्मचारी हजर राहत नाही. त्यामुळे पोलिस दूरक्षेत्र अक्षरशः बेवारस राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांची मागणी
या गंभीर दरोड्याचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी तसेच रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
हल्यात पोलिस कर्मचाऱ्याचा आई वडिलांचा समावेश नेवासा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या आप्पासाहेब वैद्य हे ड्युटीवर असून घरी आई रुक्मिणी वडील पांडुरंग वैद्य हे दोघे घरी असताना त्यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला आहे



0 टिप्पण्या