झाशी
झाशीच्या गरौठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरात चोरीची एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. एका चोराने मंदिरात चोरी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर देवीसमोर चक्क दोनवेळा हात जोडून माफी मागितली. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मढां रोडवरील प्रसिद्ध 'बडी माता' मंदिरात निळ्या रंगाचा हुडी घातलेला एक चोर शिरला. त्याने प्रत्येक मूर्तीची पाहणी केली आणि देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरले. मात्र, दागिने चोरून पळून जाण्यापूर्वी त्याने दोनवेळा देवीच्या मूर्तीसमोर हात जोडले, जणू काही तो आपल्या गुन्ह्याबद्दल देवाची माफी मागत होता. सकाळी भाविक मंदिरात आले असता कुलूप तुटलेले आणि दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अज्ञात चोराचा शोध सुरू केला आहे. चोराची ही 'भक्ती' आणि त्याने केलेली चोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

0 टिप्पण्या