मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडताना दिसत आहे. जरी संख्याबळाचा विचार केला तर महायुतीकडे (भाजप + शिंदे शिवसेना) ११४ चा बहुमताचा आकडा पार करण्याचे बळ आहे, तरीही उद्धव ठाकरे यांनी "देवाच्या इच्छेने आमचा महापौर होईल" असे विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. २२७ जागांच्या या महापालिकेत महायुतीकडे ११८ नगरसेवक आहेत, तर उद्धव ठाकरे आणि मनसे मिळून ७१ जागांवर आहेत. असे असतानाही उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यामागे २२ जानेवारीला होणारी 'आरक्षण सोडत' हे महत्त्वाचे कारण आहे.
यावेळची महापौर पदाची सोडत रोटेशन पद्धतीनुसार अनुसूचित जाती (SC), इतर मागासवर्गीय (OBC) किंवा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निघण्याची शक्यता आहे. जर आरक्षण SC किंवा OBC साठी निघाले, तर महायुतीकडे पुरेसे उमेदवार असल्याने त्यांना अडचण येणार नाही. मात्र, खरा पेच 'ST' (आदिवासी) प्रवर्गाच्या आरक्षणावरून निर्माण होऊ शकतो. संपूर्ण मुंबईत ST प्रवर्गासाठी फक्त २ जागा राखीव होत्या आणि या दोन्ही जागांवर (वॉर्ड ५३ आणि वॉर्ड १२१) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. महायुतीकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. त्यामुळे जर लॉटरी ST प्रवर्गासाठी निघाली, तर तांत्रिकदृष्ट्या केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच उमेदवार महापौर पदासाठी पात्र ठरेल. अशा वेळी महायुतीला एकतर तोडफोड करावी लागेल किंवा हे प्रतिष्ठेचे पद ठाकरेंच्या हाती सोपवावे लागेल.

0 टिप्पण्या