मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून विजयी झालेल्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी त्यांच्या गायब होण्यामागच्या नाट्यावर खळबळजनक खुलासा केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (शिंदे) गटातील एका बड्या नेत्याने राजकीय फायद्यासाठी आपल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मात्र, त्या नेत्यांना चकवा देऊन आपण निवडणुकीपूर्वी केलेला नवस फेडण्यासाठी तुळजापूरला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर परिसरात मोबाईल रेंज नसल्यामुळे मुंबईत आपल्याबद्दल काय चर्चा सुरू आहेत याची कल्पना त्यांना नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तातडीने मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून बुधवारी मध्यरात्री त्यांचे निवासस्थान गाठले. सुरुवातीला शिंदे गटात असलेल्या सरिता म्हस्के यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि तिथून त्या विजयी झाल्या. कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी न पोहोचल्यामुळे त्यांच्याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात होते, परंतु आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे.

0 टिप्पण्या