बीड
बीडमधील कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात लग्नाचा सोहळा सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच नवरदेवाने भर मंडपातून पळ काढला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी नवरदेवाचा पाठलाग केला मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला.
या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. नवरदेव, नवरी मुलीचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वऱ्हाडी आणि कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह एकूण १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बालविवाहासारख्या प्रथा रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असतानाही असा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस फरार नवरदेवाचा शोध घेत असून सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

0 टिप्पण्या