मुंबई
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मिळणाऱ्या मोफत उपचारांच्या सुविधेला आता ब्रेक लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या धोरणात मोठा बदल केला असून, यापुढे विविध वैद्यकीय सेवांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता केसपेपर काढण्यापासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत रुग्णांना ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार, रुग्णालयातील प्रवेशासाठी १० रुपये, सामान्य वॉर्डसाठी ७५ रुपये आणि एसी रूमसाठी १५० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाईल. चाचण्यांचे दरही निश्चित करण्यात आले असून एमआरआयसाठी १,६०० रुपये, तर सिटी स्कॅनसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतील. प्रसूती सेवांबाबतच्या नियमातही बदल करण्यात आला असून, पहिली प्रसूती मोफत असली तरी त्यानंतरच्या प्रसूतींसाठी शुल्क आकारले जाणार आहे. सांधा प्रत्यारोपणासारख्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना ४०,००० रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे गरीब रुग्णांच्या खिशावर भार पडणार असून आरोग्य कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या