गोंदिया
महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये नवजात बालकांच्या तस्करीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १० दिवसांच्या चिमुरडीला उपचाराचे आमिष दाखवून अडीच ते तीन लाख रुपयांना विकल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार गोंदियातील एक डॉक्टर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी डॉक्टरसह पाच जण सध्या फरार आहेत.
पांढराबोडी गावात एका महिलेकडे १० दिवसांचे बाळ असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तपास केला असता मालती वाघमारे या महिलेने हे बाळ गोंदियातून आणल्याचे सांगितले. संशय बळावल्याने जेव्हा पोलिसांनी पाठलाग केला, तेव्हा कुशारी फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एका कारमधून या बाळाची सुटका करण्यात आली. त्या वेळी कारमधील पूर्णिमा धुर्वे नावाच्या महिलेला बाळाबद्दल कोणतीही वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
४ फेब्रुवारी रोजी बाळाचे खरे आई-वडील समोर आल्यानंतर या काळ्या धंद्याचा पूर्ण उलगडा झाला. पीडित पालकांनी सांगितले की, बाळ मुदतपूर्व जन्मल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे त्यांनी गोंदियातील एका खासगी क्लिनिकमध्ये त्याला दाखल केले होते. मात्र, पैशांची अडचण असल्याचे समजताच संबंधित डॉक्टरने नागपूरच्या एका सामाजिक संस्थेत मोफत उपचार करून देण्याचे खोटे आश्वासन दिले आणि आपल्या साथीदारांमार्फत बाळाला उपचारासाठी पाठवतो असे सांगून पालकांकडून घेतले. प्रत्यक्षात त्या डॉक्टरने बाळाला नागपूरला न पाठवता आपल्या सहाय्यकाच्या मदतीने अडीच ते तीन लाख रुपयांना विकून टाकले.
वरठी पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टर, त्याची सहाय्यक ललेश्वरी सादेपाच, मालती वाघमारे, पूर्णिमा धुर्वे आणि उमेश सिंह गहलोत यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या ललेश्वरी सादेपाच हिला अटक करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके फरार डॉक्टरचा शोध घेत आहेत. संबंधित डॉक्टरच्या पदवीबाबतही संशय व्यक्त केला जात असून, वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या