मुंबई
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी होणाऱ्या एमसीए (MCA) आणि एम.एचएमसीटी (MHMCT) या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत १८ फेब्रुवारीपर्यंत होती, मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून आता उमेदवारांना २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन सादर करता येणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर अडचणींमुळे नोंदणी करू न शकलेल्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
या मुदतवाढीनुसार, पात्र उमेदवार आता २३ फेब्रुवारीपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकतात आणि अर्जाची निश्चिती (Confirmation) करू शकतात. अर्जासाठी आधार कार्ड आणि डिजीलॉकरच्या माध्यमातून तयार केलेला 'अपार' (APAAR) आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. सीईटी सेलने स्पष्ट केले आहे की, ही शेवटची मुदतवाढ असून यानंतर कोणतीही संधी दिली जाणार नाही. एमसीए प्रवेशासाठीची संभाव्य परीक्षा ३० मार्च रोजी, तर एम.एचएमसीटीची परीक्षा २५ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या