बोधेगाव प्रतिनिधी
शेवगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना घडली असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेवगाव शाखेतून पैसे काढल्यानंतर अवघ्या सव्वा तासात अज्ञात चोरट्यांनी स्कुटीची डिक्की फोडून तब्बल ५ लाख रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेवगाव येथील शेतकरी बाबुराव भाऊराव कमानदार (वय ६०, व्यवसाय – शेती) यांनी जागा खरेदीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेतून ५ लाख रुपये रोख रक्कम काढली होती. ही रक्कम तसेच बँकेचे चेकबुक त्यांनी एमएच १६ सीएक्स १९६१ क्रमांकाच्या स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते.
दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी १२.३५ या कालावधीत आयटीआय परिसरात अज्ञात चोरट्यांनी स्कुटीची सीट तोडून डिक्की फोडली व त्यातील ₹५,००,००० रोख रक्कम (₹५०० च्या १००० नोटा) तसेच स्टेट बँकेचे चेकबुक चोरून नेले. भरदिवसा शहरातील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बँक परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे का? शहरातील पोलिसांची गस्त व्यवस्था प्रभावी आहे का? चोरट्यांनी आधीच रेकी केली होती का? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
पीडित शेतकऱ्याने शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रात्री उशिरा चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात चारचाकी वाहनाची काच फोडून सुमारे ५ ते ६ लाख रुपये चोरीला गेले होते. त्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
शेवगाव शहरात नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ९० लाख रुपये खर्च करून विविध चौक व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा तसेच सर्व प्रमुख बँक परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 टिप्पण्या