भगवानगडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन
शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे श्रीगुरु संत जनार्दन स्वामी यांचा जन्म, अनुग्रह आणि नाथांनी देह गंगार्पण केलेली तिथी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. या पवित्र तिथीला ‘नाथषष्ठी’ असे संबोधले जाते. नाथांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना याच दिवशी घडल्यामुळे या तिथीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी ह.भ.प. श्री कृष्णा महाराज शास्त्री यांनी केले.
नाथषष्ठीनिमित्त राज्यभरातून अनेक साधुसंतांच्या दिंड्या पैठण येथे दाखल होतात. पवित्र गोदावरी तीरावर दिंडीतील वारकरी कीर्तन-भजनाच्या माध्यमातून ‘भानुदास-एकनाथ’ नामाचा जयघोष करीत असतात. देशभरातून हजारो भाविक या दिवशी नाथांच्या दर्शनासाठी पैठण येथे येतात. या दिंड्यांमध्ये श्रीक्षेत्र भगवानगडाची दिंडीही विशेष मानाची असून, वै. संत भगवानबाबांनी सुरू केलेल्या या दिंडीला नाथपरंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भगवानगडाहून निघालेली ही दिंडी पैठण येथे पोहोचल्यानंतर फाल्गुन वद्य षष्ठी व सप्तमी असे दोन दिवस भगवानगडाच्या फडामध्ये कीर्तन-भजनाद्वारे नाथांच्या नामाचा गजर करण्यात आला. परंपरेप्रमाणे अष्टमीच्या दिवशी ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्री यांच्या आदेशानुसार भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी ह.भ.प. श्री कृष्णा महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने नाथषष्ठी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कीर्तनात महाराजांनी अभंगांचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, अभंग हे नामपर, उपदेशात्मक, स्थितीपर, आदेशपर आणि मागणीपर अशा विविध प्रकारचे असतात; मात्र गौळण ही भक्ती आणि प्रेमरसाने परिपूर्ण असते. काल्याच्या कीर्तनासाठी त्यांनी संत एकनाथ महाराजांची एक गौळण निवडून तिचे भावपूर्ण विश्लेषण केले.
यावेळी संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रालाही उजाळा देताना त्यांनी सांगितले की, संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होते. भानुदास-चक्रपाणी-सूर्यनारायण-एकनाथ अशी त्यांची परंपरा आहे. मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे बालपणीच त्यांचे आई-वडील निवर्तले, असा उल्लेख त्यांच्या ‘मुळीच्या मुळी’ या अभंगातून आढळतो. त्यांच्या घराण्यात परंपरेने विठ्ठलभक्ती रुजलेली होती.
विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची मूर्ती आपल्या राजधानीत नेली होती. ती पुन्हा पंढरपूर येथे आणण्याचे कार्य संत भानुदास महाराजांनी केले. त्यामुळे या घराण्यातील विठ्ठलप्रेम विशेष असल्याचे दिसून येते. संत एकनाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामी होत. इ.स. १५०४ ते १५७५ हा त्यांचा काळ मानला जातो. जनार्दन स्वामींचा जन्म, अनुग्रह आणि समाधी ही तिन्ही घटनाही फाल्गुन वद्य षष्ठीला झाल्याचे मानले जाते.
नाथषष्ठी उत्सवाची परंपरा संत एकनाथ महाराजांनीच सुरू केली आणि याच दिवशी त्यांनी गंगार्पण केले. संत एकनाथ महाराजांचा कालखंड इ.स. १५३३ ते १५९९ असा मानला जातो.
भगवानगडाच्या दिंडीबाबत बोलताना कृष्णा महाराज शास्त्री म्हणाले की, मराठवाड्यातून नाथषष्ठीसाठी निघालेली पहिली दिंडी संत भगवानबाबांनी सुरू केली. त्यामुळे नाथपरंपरेमध्ये भगवानगडाच्या दिंडीला विशेष मान आहे. आजही संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनामध्ये पहिल्या चालीचा मान भगवानगडालाच दिला जातो. संत भगवानबाबांनी सुरू केलेली ही परंपरा पुढे गुरुवर्य संत भीमसिंह महाराजांनी जपली आणि सध्या न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ती सुरू आहे. भगवानगडाची सर्व उपसंस्थाने व भाविक भक्त ही परंपरा श्रद्धेने पुढे नेत आहेत.
काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांना शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा महाप्रसाद देण्यात आला आणि नाथषष्ठी सोहळ्याची सांगता करण्यात आली

0 टिप्पण्या