बुलढाणा
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच पत्नीची हत्या करण्यासाठी एका शिक्षक पतीने रचलेला कट पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वृषाली प्रकाश गावंडे असे मृत शिक्षिकेचे नाव असून, आरोपी पतीने त्यांना मारण्यासाठी आधी तीन वेळा अन्नातून विष देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. जेव्हा विषप्रयोगाचे प्रयत्न फोल ठरले, तेव्हा त्याने अत्यंत थंड डोक्याने पत्नीला कायमचे संपवण्याचा कट रचला. आरोपी पतीने मंगेश चुलकार आणि मनीष सूर्यवंशी या दोघांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन, वृषाली यांच्या शाळेत जाताना त्यांच्या स्कूटीला जाणूनबुजून कारने धडक दिली. २ मार्च रोजी घडलेला हा अपघात सुरुवातीला सामान्य वाटत असला, तरी जलगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील कारस्थान उघडकीस आणले. या प्रकरणात पती प्रकाश गावंडेसह तिघांना अटक करण्यात आली असून, सुशिक्षित कुटुंबातील अशा क्रूरतेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

0 टिप्पण्या