मुंबई
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादाने त्रस्त असलेली एक विवाहित महिला जेव्हा मदतीसाठी खरातकडे गेली, तेव्हा त्याने स्वतःला त्रिकालज्ञानी आणि अवतारी पुरुष भासवून तिचा विश्वास संपादन केला. "तू गेल्या जन्मीची अप्सरा आहेस आणि तुझा घटस्फोट होणे आधीच नियतीमध्ये ठरलेले आहे," असे सांगून त्याने महिलेची दिशाभूल केली. या अंधश्रद्धेचा आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने धार्मिक विधी, भविष्य सांगणे आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली त्या महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, शोषणादरम्यान पीडित महिला गरोदर राहिली असता खरातने तिला आपल्या कार्यालयात बोलावून गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, "माझ्या नशिबात दोन लग्ने आहेत, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना सुखी ठेवेन," असे खोटे आश्वासन देऊन तो तिला सातत्याने फसवित राहिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले की, या प्रकरणाचा तपास एसआयटी (SIT) करत असून दोषीवर कठोर कारवाई केली जाईल. १० मार्च रोजीच खरातविरुद्ध एलओसी (LOC) जारी करण्यात आली होती जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही. महिलांच्या आत्मसन्मानाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देखील सरकारने दिली आहे.

0 टिप्पण्या