मंडप उभारणीचे काम अंतिम टप्यात
बोधेगाव प्रतिनिधी
संत श्री भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या अखंड आध्यात्मिक परंपरेतील ९२ वा नारळी सप्ताह यंदा ता. पाथर्डी येथील बडेवाडी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर गावात सर्वत्र तयारीचा वेग वाढला आहे. भव्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, संपूर्ण गावच या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे.
भगवानगडाच्या पायथ्याशी वसलेल्या सुमारे ४०० लोकवस्तीच्या बडेवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत लोकवर्गणीतून सप्ताहाचे आयोजन हाती घेतले आहे. कथेसाठी तब्बल ९० फूट बाय ३०० फूट असा भव्य मंडप उभारण्यात येत आहे, तर हरिकीर्तनासाठी ३० बाय ६० फूट आकाराचे प्रशस्त स्टेज उभारले जाणार आहे. मंडप उभारणी, वीज व्यवस्था, पिण्याचे पाणी, भाविकांसाठी निवास, वाहतूक आणि आरोग्य सुविधा यांचे नियोजन सुयोग्य पद्धतीने केले जात आहे.
श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांनी बडेवाडी येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला असून ग्रामस्थांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयोजन अधिक शिस्तबद्ध व भव्य होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सप्ताहाचा शुभारंभ मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी होणार असून सांगता मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. सप्ताहादरम्यान श्रीमद् भागवत कथेसाठी प्रख्यात भागवताचार्य प्रकाश महाराज साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून विविध नामवंत कीर्तनकार आपल्या वाणीने भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.
हरिकीर्तन कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
- ३१ मार्च – श्री रामगीरी महाराज येळीकर
- ०१ एप्रिल – श्री तुकाराम महाराज शास्त्री मुंडे (परळीकर)
- ०२ एप्रिल – श्री ज्ञानेश्वर महाराज जळकीकर (जळगावकर)
- ०३ एप्रिल – श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर (समाज प्रबोधनकार)
- ०४ एप्रिल – श्री प्रभाकर महाराज बोधले (पंढरपूर)
- ०५ एप्रिल – श्री प्रकाश महाराज साठे (भागवताचार्य)
- ०६ एप्रिल – महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे विशेष हरिकीर्तन
- ०७ एप्रिल – सकाळी ११ ते १ काल्याचे कीर्तन व सांगता
या सप्ताहात नामांकित प्रवचनकार, कीर्तनकार, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
अन्नदान व ज्ञानदानाची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नारळी सप्ताहात दररोज मोठ्या प्रमाणावर सामूहिक अन्नदान केले जाते. त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गदर्शन, निर्व्यसनीपणाचे प्रशिक्षण, जीवनमूल्यांची जाणीव आणि संत विचारांचा प्रसार यावर विशेष भर दिला जातो. संत भगवानबाबांनी सुरू केलेल्या या परंपरेमुळे समाजातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येऊन सामाजिक ऐक्य दृढ होते.
दरम्यान, देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्व सोयी-सुविधांची व्यापक तयारी करण्यात आली आहे. बडेवाडी परिसर सध्या भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला असून, सप्ताहाच्या निमित्ताने आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध
यंदा भाविकांसाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे सप्ताहाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या भाविकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी “आनंदाचे सिद्धांत” या युट्यूब चॅनलवरून संपूर्ण सप्ताहाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांना घरबसल्या श्रीमद् भागवत कथा, हरिकीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
सप्ताहादरम्यान दररोज होणारी श्रीमद् भागवत कथा, रात्रीचे हरिकीर्तन, तसेच विशेष कार्यक्रमांचे थेट दर्शन या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा प्रकारे पारंपरिक धार्मिक सोहळ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, भक्तांना अधिकाधिक जोडण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.



0 टिप्पण्या