अहमदनगर

इच्छामृत्यूची परवानगी मिळणारे पहिले भारतीय हरीश राणा यांच्यावर अंत्यसंस्कार; १३ वर्षांच्या कोमानंतर निधन


नवी दिल्ली

भारतात 'पॅसिव्ह युथनेशिया' म्हणजेच निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी मिळवणारे पहिले व्यक्ती हरीश राणा यांचे मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीच्या ग्रीन पार्क स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ३१ व्या वर्षी हरीश यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली १३ वर्षे ते कोमात होते आणि त्यांच्या निधनाची बातमी समजताच गाझियाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी शोककळा पसरली.

हरीश राणा यांची कहाणी अत्यंत दुर्दैवी आहे. २०१३ मध्ये चंदिगड येथे शिक्षण घेत असताना ते वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले होते. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे ते 'क्वाड्रिप्लेजिया' या स्थितीत गेले. ही अशी अवस्था असते ज्यामध्ये रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय निकामी होतात. मान किंवा पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाल्यामुळे शरीराची हालचाल पूर्णपणे थांबते आणि रुग्णाला शौच-मुत्राची जाणीवही राहत नाही. गेली १३ वर्षे हरीश हे एका 'जिवंत प्रेतासारखी' अवस्था अनुभवत होते आणि त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला होता. गाझियाबादच्या हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामृत्यू देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली होती. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना ठरली आहे. सलग १३ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या हरीश यांचे २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी निधन झाले, ज्यामुळे एका दीर्घ संघर्षाचा अंत झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या