अहमदनगर

बोधेगावात दोन गटांत जीवघेणा हल्ला; पिनू कापसेसह दोघे गंभीर जखमी

जुन्या वादातून शासकीय विश्रामगृह परिसरात थरार; गोळीबाराच्या चर्चेने परिसरात खळबळ


बोधेगाव प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन गटांत झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिस कर्मचारी कोलते यांच्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला सुरेश उर्फ पिनू कापसे (रा. अंतरवाली बुद्रुक, ता. शेवगाव) आणि गणेश कापसे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे बोधेगाव व परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोधेगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शेवगाव–गेवराई राज्यमार्गालगत रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिनू कापसे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गणेश कापसे यांच्यात अचानक वाद निर्माण झाला. पूर्वीपासून सुरू असलेल्या कारणावरून हा वाद उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. काही क्षणांतच या वादाचे रूप तीव्र चकमकीत बदलले आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या चकमकीदरम्यान धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीत पिनू कापसे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. तर गणेश कापसे यांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. दोघांनाही तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, अधिकृतरीत्या गोळीबाराची पुष्टी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी सोमीनाथ बांगर, ईश्वर गर्जे, गणेश बांगर, अर्जुन ढवळे तसेच इतर पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढविला व प्राथमिक चौकशी सुरू केली.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना दूर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

अलीकडच्या काळात शेवगाव तालुक्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामागे जुना वाद, वैयक्तिक वैर की टोळी संघर्ष आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या घटनेप्रकरणी पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या