प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील फाफामऊ परिसरात सोमवारी संध्याकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. येथील चंदापूर भागात सपा नेते अंसार अहमद यांच्या मालकीचे कोल्ड स्टोरेज पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. या भीषण दुर्घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला असून, त्यामध्ये इमारतीचे छत कशाप्रकारे भराभराकर कोसळले हे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओतून कोल्ड स्टोरेजच्या बांधकामात नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे आणि कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण कोल्ड स्टोरेज केवळ खांबांच्या आधारावर उभे होते आणि त्याला आरसीसी बीमचा कोणताही आधार दिलेला नव्हता. एवढ्या कमकुवत संरचनेवर हजारो टन वजनाचे ट्रक उभे केले जात होते, ज्यामुळे अखेर ही इमारत जमीनदोस्त झाली. इमारत कोसळल्यामुळे आतील अमोनिया गॅसचा टँक फुटला आणि विषारी वायूची गळती सुरू झाली. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले मजूर बाहेर पडण्यापूर्वीच या गॅसच्या विळख्यात अडकले, ज्यामध्ये पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. बचाव पथकाने १६ जणांना सुरक्षित बाहेर काढले असून पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

0 टिप्पण्या