अहमदनगर

तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण वायू गळती: भगेरिया केमिकल्समधील घटनेने खळबळ


तारापूर 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भगेरिया केमिकल्स या कंपनीत दुपारी दोनच्या सुमारास ओलियम वायूची मोठी गळती झाली. या वायूचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क आल्याने परिसरात सल्फर डायऑक्साइडचे लोट पसरले असून, वाऱ्याच्या दिशेमुळे सुमारे दीड किलोमीटर परिसरातील नागरिकांना याचा त्रास जाणवू लागला आहे. प्रामुख्याने कामगार आणि स्थानिक रहिवाशांना डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे आणि घशात खवखव अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंपनीजवळील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क केले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एक टन ओलियमची गळती झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वायू गळतीमुळे बोईसर परिसरात पांढऱ्या धुराचे साम्राज्य पसरले असून खबरदारीचा उपाय म्हणून तारापूर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या