अमरावती
महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा भागात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर सुमारे ३५० आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आणि त्यानंतर ते प्रसारित करण्यात आले असा खळबळजनक आरोप होत आहे. भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणात सुमारे १८० मुली बळी ठरल्या असावा असा दावा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे.
या घटनेमुळे राज्यातील राजकारणही तापले असून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिला सुरक्षा केवळ घोषणांपुरती मर्यादित राहू नये आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करताना कोणताही भेदभाव करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दुसरीकडे, सरकारने महिला सुरक्षेबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण असल्याचे स्पष्ट करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, स्थानिक परिसरात तणावाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात १९ वर्षीय अयान अहमद तनवीर अहमद याला अटक केली आहे. आरोपीने मुलींशी मैत्री करून त्यांच्या संमतीशिवाय अश्लील आशय तयार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, पॉक्सो (POCSO) आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. पीडित मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले असून त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल असे आश्वासन दिले आहे.

0 टिप्पण्या