अहमदनगर

संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा पर्दाफाश: 'दत्तधाम'च्या राजेंद्र बापू गडगेवर अखेर गुन्हा दाखल


अहिल्यानगर

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील स्वतःला 'दत्तधाम सरकार' म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र बापू गडगे या भोंदू महाराजाचा खरा चेहरा अखेर समोर आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी या तथाकथित महाराजासह पाच जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दैवी शक्तीचा बनाव करून लोकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करणाऱ्या या टोळीवर आता कायदेशीर टाच आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडगे हा कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्राने बरे करण्याचे आणि निपुत्रिक महिलांना अपत्यप्राप्ती करून देण्याचे खोटे दावे करत असे. या अघोरी उपायांच्या नावाखाली तो ११ हजार ते ५१ हजारांपर्यंतची रक्कम भाविकांकडून उकळत होता. गेल्या ८-१० वर्षांत त्याने या फसवणुकीतून करोडो रुपयांची माया जमवल्याचा आरोप असून, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांत मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात राजेंद्र गडगेसह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

हा भोंदू बाबा सोशल मीडियाचा वापर करून आपल्या मठातील 'चमत्कार' लाईव्ह दाखवत असे, ज्यामुळे अनेक लोक त्याच्या जाळ्यात ओढले गेले. "चौदा महिन्यांत श्रीकृष्णासारखा मुलगा होईल" अशा स्वरूपाचे विकृत आणि दिशाभूल करणारे दावे तो महिलांसमोर करत असे. धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या वर्षांपासून हे कृत्य सुरू असतानाही पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर का केला, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणामुळे काही काळापूर्वी गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या