अहमदनगर

दिलीपराव लांडे यांचे निधन


बोधेगाव प्रतिनिधी | शेवगाव

शेवगाव तालुक्याचे बुलंद व्यक्तिमत्व आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले स्व. दिलीपराव नरसिंहराव लांडे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जोहरापूरचे सरपंच म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या लांडे यांनी पुढे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पंचायत समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अशी विविध महत्त्वाची पदे भूषवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात वेगळी छाप उमटवली.

स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय धडे घेतले. त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि नरेंद्र घुले यांच्या सहवासात त्यांनी कार्य करत आपले नेतृत्व अधिक सक्षम केले. अभ्यासू, धडाडीचे आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दररोज ‘दरबार’ भरत असे. त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे ते जनतेच्या मनात घर करून राहिले होते. दिलीप भाऊ या नावाने त्यांना ओळखले जात होते 

गेल्या काही वर्षांत त्यांना आजारपणाचा त्रास सहन करावा लागला. पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. तरीही त्यांनी समाजाशी आपली नाळ कायम ठेवली होती.

लांडे यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यांनी ती जाणीवपूर्वक टाळली होती. शेवगाव तालुक्याच्या राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकणारे हे कर्तृत्ववान नेतृत्व आज हरपल्याने समाजाची मोठी हानी झाली आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. जोहरापूर येथे सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यविधीस खासदार निलेश लंके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या