पुणे
खेड तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीत चाकण-शिक्रापूर रोडवरील इंडियन ऑइल पार्किंगमध्ये टँकरमधून बेकायदेशीरपणे गॅस चोरी करणाऱ्या टोळीवर चाकण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टँकरच्या आउटलेट पाईपला नोझल लावून जीवाची पर्वा न करता घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या अंबादास गाडे, अक्षय मुंगसे आणि नवनाथ होजगे या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे साडेचारच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत गॅस टँकर, सिलिंडर आणि इतर साहित्यासह एकूण ४९ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

0 टिप्पण्या