नवी दिल्ली
भारत आणि नेपाळ सीमेवर सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये नेपाळी सुरक्षा दलाचे जवान आणि कस्टम अधिकारी भारतीय प्रवाशांच्या बॅगांची कसून तपासणी करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, कोल्ड ड्रिंक्स, केळी आणि दैनंदिन गरजेच्या किरकोळ वस्तूंनाही नेपाळमध्ये नेण्यापासून रोखले जात आहे. नेपाळ सरकारने १०० नेपाळी रुपयांपेक्षा (अंदाजे ६३ भारतीय रुपये) जास्त किमतीच्या वस्तूंवर कस्टम ड्युटी सक्तीची केल्याने हा पेच निर्माण झाला आहे. संतापलेल्या एका प्रवाशाने तर सीमेवरच केळी ठेचून आपला निषेध व्यक्त केला.
या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. विशेष म्हणजे, भारत आणि नेपाळमध्ये 'रोटी-बेटी'चे जुने नाते असून भारत आजही नेपाळी तरुणांना आपल्या लष्करात (गोरखा रेजिमेंट) सामावून घेतो. त्यांना मिळणारे वेतन, निवृत्तीवेतन आणि सन्मान यामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. अशा परिस्थितीत नेपाळने किरकोळ वस्तूंसाठी दाखवलेली ही कडक भूमिका भारतीयांना खटकत आहे. नेपाळ सरकारने मात्र हा निर्णय करचोरी रोखण्यासाठी आणि स्थानिक व्यापाराला संरक्षण देण्यासाठी घेतल्याचे म्हटले आहे. तथापि, दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध पाहता, असे छोटे वाद चर्चेने सोडवावेत अशी मागणी जोर धरत आहे.

0 टिप्पण्या