भुवनेश्वर
माणूस आणि प्राणी यांच्यातील इमानदारीच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील, पण ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने माणुसकी आणि प्राण्यांचे अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. मयूरभंज जिल्ह्यातील धिरकुला गावात 'काली' नावाच्या एका भटक्या कुत्र्याने स्वतःच्या प्राणांची बाजी लावून ३० हून अधिक चिमुकल्यांचे प्राण वाचवले. या शौर्यासाठी कालीला आपले प्राण गमवावे लागले असून, सध्या संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री जगन्नाथ शिशु विद्या मंदिराच्या बाहेर किंडरगार्टनची ३० हून अधिक मुले बसली होती. अचानक एक विषारी साप मुलांच्या दिशेने सरकू लागला. लहान मुले या संकटापासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. त्याच वेळी काली तिथे पोहोचला आणि त्याने धोक्याची चाहूल लागताच मुलांच्या समोर ढालीसारखे उभे राहून सापावर झडप घातली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काली आणि सापामध्ये बराच वेळ संघर्ष चालला. अखेर कालीने सापाला मारून मुलांचे रक्षण केले, मात्र या लढाईत सापाने कालीला अनेक ठिकाणी दंश केला होता. शरीरात विष पसरल्यामुळे काही वेळातच या इमानी श्वानाचा मृत्यू झाला. कालीच्या या बलिदानाने भावूक झालेल्या गावकऱ्यांनी त्याचे विधिवत अंत्यसंस्कार केले. फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून त्याची अंतयात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये संपूर्ण गाव सहभागी झाला होता. आपल्या मुलांचे प्राण वाचवणाऱ्या या 'हिरो'ला गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.

0 टिप्पण्या