मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि पवार कुटुंबातील वादावर महत्त्वाची विधाने केली आहेत. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सध्यातरी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या बातम्या त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या. भूतकाळात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या विषयावर चर्चा झाली होती, मात्र सध्या तशी कोणतीही स्थिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुनील तटकरे यांनीही यापूर्वी अजित पवारांच्या हयातीत अशा शक्यतांवर विचार झाल्याचे मान्य केले होते, परंतु त्यांचा गट भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सोबतच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेवर २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे पवार कुटुंब आणि महायुतीमधील राजकीय संघर्श पुन्हा एकदा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंबात शोककळा असल्याने आम्ही कोणताही उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. मात्र, या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार देण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

0 टिप्पण्या