बिहार
बिहारमधील समस्तीपुर येथील पटोरी रेल्वे स्थानकावर एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक ट्रेन सुरू झाल्यामुळे चार जणी थेट धावत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकल्या. ट्रेनचे तब्बल १० डबे अंगावरून जाईपर्यंत या चारही जणी रुळाला टेकून श्वास रोखून बसल्या होत्या. सुदैवाने या भीषण प्रसंगातून सर्व जणी थोडक्यात वाचल्या असून तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, तर एक चिमुरडी सुखरूप आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोसडा येथील रहिवासी असलेल्या या महिला एका लग्नकार्यावरून घरी परतत होत्या. स्थानकावर ९ जण रेल्वे रुळ ओलांडत असताना ५ जण सुरक्षितपणे पलीकडे गेले, मात्र ममता देवी, जयमाला देवी, सोनाली कुमारी आणि एक लहान मुलगी मागे राहिल्या. त्याच वेळी प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन अचानक सुरू झाली. समोर काळ दिसल्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मधल्या अरुंद जागेत धाव घेतली आणि तिथेच पडून राहिल्या. ट्रेन निघून गेल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तिन्ही जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार महिलांच्या हाता-पायाला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रेल्वे रुळ ओलांडताना केलेली एक छोटीशी चूक कशी जीवावर बेतू शकते, याचीच साक्ष देणारी ही घटना आहे.

0 टिप्पण्या