जळगाव
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून गुरु-शिष्य नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एक ६१ वर्षीय शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून चौथीतील एका चिमुरडीवर अत्याचार करत असल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. हा नराधम शिक्षक शाळेत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत होता. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलिसांनी आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पीडित मुलगी ही स्थानिक जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकते. आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा रोज सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच १० वाजण्याच्या सुमारास पीडितेला वर्गात झाडू मारण्याच्या बहाण्याने आधीच बोलावून घेत असे. शाळेत इतर कोणीही नसण्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. गेल्या दोन वर्षांपासून भीती दाखवून हा प्रकार सुरू होता. ३० एप्रिल २०२६ रोजी, म्हणजेच शाळेच्या शेवटच्या दिवशी या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला. यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.
याप्रकरणी डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी माहिती दिली की, एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाबाबत पीडितेच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून संबंधित शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जात असून, आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस भक्कम पुरावे गोळा करत आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल शिक्षण विभागालाही पाठवण्यात आला असून आरोपीवर कडक खात्यांतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या