अहमदनगर

नांदेडकरांचा शेवगाव पंचायत समितीवर धडक मोर्चा; ‘सोनल शहा यांना निलंबित करा’च्या घोषणांनी परिसर दणाणला

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील कथित गैरव्यवहाराविरोधात संतप्त ग्रामस्थांचा एल्गार; चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी


शेवगाव  प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायतींच्या मूल्यांकन प्रक्रियेत कथित गैरव्यवहार, पक्षपातीपणा, आर्थिक हितसंबंध जोपासणे आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा गंभीर आरोप करत नांदेड जिल्ह्यातील धर्मापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सोमवारी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार जागरण-गोंधळ आंदोलन छेडले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांसह आणि जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी पंचायत समिती प्रशासनाचा निषेध नोंदविला. "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील गैरव्यवहारांची चौकशी करा", "दोषींवर कारवाई करा", "सोनल शहा यांना निलंबित करा" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शेवगाव पोलिसांच्या देखरेखीखाली आंदोलन शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली होती.

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यांकन करताना निष्पक्षता राखण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींना कमी गुण देण्यात आले, तर काही ग्रामपंचायतींना नियमबाह्य पद्धतीने प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रक्रियेची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी सरपंच संघटना तालुका सचिव तथा कारेगावचे सरपंच प्रतिनिधी गणेश गिरी, सतीश पाटील शिंदे, हसनाळीचे हणमंत पाटील किरोळे, चिंचोलीचे पोषटी वासनिकर, समराळाचे सिद्धेश्वर मठपती, गजानन कुलकर्णी यांच्यासह धर्मापूर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणांमधून प्रशासनावर तीव्र टीका केली. "ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना न्याय मिळाला पाहिजे. शासनाच्या योजनांचा वापर काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी होऊ देता कामा नये. ग्रामविकासाच्या नावाखाली सुरू असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही," अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

आंदोलनकर्त्यांनी वाजत-गाजत पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी सोनल शहा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात काही काळ चर्चा झाली. निवेदन स्वीकारताना संबंधित मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेबाबतचा वाद यापूर्वीही चर्चेत आला होता. शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी अभियानातून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ पंचायत समिती कार्यालयासमोर मुंडण आंदोलन केले होते. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी थेट शेवगावमध्ये येऊन जागरण-गोंधळ आंदोलन केल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोषींवर तातडीने कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही, तर राज्यभरातील ग्रामपंचायतींना एकत्र करून राज्यस्तरीय तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेवर निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत शासन काय भूमिका घेते, याकडे आता ग्रामस्थांसह राज्यभरातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या