अहमदनगर

एक गाव, ८ मृत्यू आणि २१ जणांच्या नरबळीचा कट! छत्तीसगडमध्ये खजिन्याच्या हव्यासापोटी खळबळजनक घटना


छत्तीसगड

छत्तीसगडमधील बलौदाबाजार जिल्ह्यातील कसडोल परिसरातील खरवे गावात गेल्या चार महिन्यांत ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हे मृत्यू नैसर्गिक मानले जात होते, परंतु एकापाठोपाठ एक लोकांचा जीव गेल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. या मृत्यूंमागे मोठे कारस्थान असल्याच्या चर्चा संपूर्ण गावात सुरू झाल्या आहेत.

गावातील एका किराणा दुकानदाराने गूढ खजिना मिळवण्याच्या लालसेपोटी तांत्रिक विधी आणि नरबळीचा मार्ग निवडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खजिना शोधण्यासाठी त्याने तब्बल २१ जणांचा नरबळी देण्याचा भयानक कट रचला होता, असा संशय आहे. या कथित योजनेचा भाग म्हणून दारूमध्ये विषारी पदार्थ किंवा गुंगीचे औषध मिसळून लोकांना पाजण्यात आले. दारू पिल्यानंतर काही मिनिटांतच संबंधितांना उलट्या, चक्कर आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्ध, मजूर आणि गावातील इतर नागरिकांचा समावेश आहे. मात्र, हे मृत्यू नेमके कशामुळे झाले, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि प्रशासनाने तपास तीव्र केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी थडगी खोदून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली असून, एका मृतदेहाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (Forensic Lab) पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञ व्हिसरा आणि इतर नमुन्यांची तपासणी करून मृत्यूचे खरे कारण समोर आणतील. ८०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात भीतीचे वातावरण असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या