शेवगाव प्रतिनिधी
श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होत असलेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सर्व गटांतील उमेदवारांची संख्या २१ जागांसाठी २१ इतकीच राहिल्याने निवडणुकीची औपचारिकता पूर्ण झाली. यामुळे माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाने पुन्हा एकदा कारखान्यावर आपले वर्चस्व कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे संचालक मंडळात मोठ्या प्रमाणावर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. २१ पैकी तब्बल १३ ते १४ नवोदित व तुलनेने नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून "तरुणांना संधी" आणि "नव्या नेतृत्वाला व्यासपीठ" या मागण्या होत होत्या. त्याला यंदाच्या निवडणुकीत काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
विरोधी गटाने काही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या प्रक्रियेनंतर सर्व जागांवर एकमेव उमेदवार शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली नाही.
संचालक मंडळात नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्यासह अनुभवी नेतृत्व कायम ठेवत नव्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या निवडीमुळे आगामी काळात कारखान्याच्या विकासाबरोबरच तालुक्यातील सहकार आणि राजकारणातील समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बिनविरोध निवड झालेले संचालक
सर्वसाधारण शेवगाव गट :
सुधाकर नारायणराव नरवडे, पंडीत रामभाऊ भोसले, रामनाथ नामदेव राजपूरे
सर्वसाधारण शहरटाकळी गट :
नरेंद्र मारुतराव घुले, चंद्रशेखर मारुतराव घुले, बाळासाहेब बापुसाहेब खरड
सर्वसाधारण कुकाणा गट :
नारायण कारभारी म्हस्के, हिम्मतसिंह देसाई देशमुख, अमोल विठ्ठल अभंग
सर्वसाधारण नेवासा गट :
जनार्दन कचरू शेळके, दादासाहेब गुलाबराव कोकणे
सर्वसाधारण वडाळा गट :
जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे
सर्वसाधारण ढोरजळगाव गट :
मच्छिंद्र सुर्यभान म्हस्के, गोरक्षनाथ विठ्ठल भेडेकर
सहकारी संस्था प्रतिनिधी :
बबनराव मुरलीधर भुसारी
अनुसूचित जाती-जमाती :
विकास चंद्रभान नन्नवरे
महिला राखीव :
सुमनबाई दत्तात्रय काळे, रंजना अशोक तानवडे
इतर मागासवर्ग :
संतोष शंकरराव पावसे
वि.जा.भ.ज./विमाप्र :
अशोक लक्ष्मण मिसाळ
ज्ञानेश्वर कारखान्याच्या या बिनविरोध निवडणुकीमुळे घुले गटाचे संघटनात्मक बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले असून नव्या आणि जुन्या नेतृत्वाच्या समन्वयातून कारखान्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त होत आहे.
----------
घुले बंधूंचा मोठेपणा
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत महिला राखीव गटातून पिंगेवाडीच्या रंजना अशोक तानवडे यांनी विरोधी उमेदवारी दाखल केली होती. एका जागेसाठी निवडणूक होण्याची शक्यता असताना माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी समन्वयाची भूमिका घेत तानवडे यांना संधी दिली. लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांनी दिलेला सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सहकाराचा मंत्र घुले बंधूंनी कायम जपल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या