अहमदनगर

बैल दगावल्याने पत्नीला जुंपून शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मदतीला धावले देवेंद्र फडणवीस; व्हिडिओ व्हायरल होताच तातडीने दिला नवा बैल


मुंबई

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण संकटाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले. वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू झाल्यामुळे, शेतीचे काम पूर्ण करण्यासाठी एका हतबल शेतकऱ्याला आपल्या पत्नीलाच जुंपून नांगरणी करावी लागली होती. ही हृदयद्रावक बातमी समोर येताच संपूर्ण प्रशासन कामाला लागले आणि अवघ्या काही तासांतच या शेतकरी कुटुंबाला नवा बैल आणि सरकारी नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली.

हे संपूर्ण प्रकरण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द गावचे आहे. येथील भूमिहीन शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या बैलाचा ५ जून रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वीज कोसळण्याच्या घटनेत मृत्यू झाला होता. बैलाचा मृत्यू झाल्याने गायकवाड यांच्यासमोर पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, शेतीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी काशीनाथ गायकवाड यांना आपल्या पत्नी हौसाबाई यांना बैलाच्या जागी जुंपून शेत नांगरावे लागले.

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लातूर जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालय, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाला या शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सर्व संबंधित यंत्रणा सक्रिय झाल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने हालचाली करत शेतकऱ्यासाठी नवीन बैल उपलब्ध करून दिला. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बैल थेट गायकवाड कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला, तसेच वीज कोसळून दगावलेल्या बैलाची सरकारी नुकसानभरपाई देखील तात्काळ मंजूर करण्यात आली.

शासनाकडून मिळालेल्या या गतिमान आणि संवेदनशील मदतीमुळे गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत मदत मिळाल्यामुळे आमची शेती वाचली, अशा भावना व्यक्त करत गायकवाड कुटुंबाने देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. एका गरीब शेतकऱ्याची अडचण ओळखून दाखवलेल्या या तत्परतेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या