अहमदनगर

पुणे रेव पार्टीवर पोलिसांचा मध्यरात्री मोठा छापा; १५६ तरुण-तरुणी ताब्यात, ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे

पुणे शहरात गुन्हे शाखेने मध्यरात्री एका हाय-प्रोफाइल रेव पार्टीवर मोठी कारवाई केली आहे. आळंदी-मरकल रस्त्यावरील तुळापूर परिसरातील एका बंगल्यात 'प्रोजेक्ट X हाऊस' नावाने ही पार्टी सुरू होती. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या या अवैध पार्टीची माहिती मिळताच पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत १५ पोलीस अधिकारी आणि ६५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला होता.

पार्टीच्या ठिकाणी तब्बल १०७ पुरुष आणि ४९ महिला असे एकूण १५६ तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले. यामध्ये २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, या कार्यक्रमासाठी दारू पुरवण्याचा परवाना केवळ शनिवार रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच वैध होता, मात्र त्यानंतरही ही पार्टी अनधिकृतपणे सुरूच ठेवण्यात आली होती.

या छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ९ लाख २२ हजार रुपये किमतीचा दारूचा साठा, ३ ग्रॅम गांजा आणि तीन कप पॉट्समध्ये ठेवलेले १० प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स जप्त केले आहेत. यासोबतच महागड्या गाड्या आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह एकूण ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पार्टीचे मुख्य आयोजक 'ब्लेज एंटरटेनमेंट'चा ऐमन शेख आणि 'स्टार लाईट एंटरटेनमेंट'चा यश चौधरी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या वापराच्या संशयावरून काही साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या