अहमदनगर

राहात्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर चालला बुलडोझर; अहिल्यानगरमधील पहिलीच मोठी कारवाई


राहता

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्य आरोपीविरोधात प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याने केलेले बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून बुलडोझरच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात अशा स्वरूपाची ही पहिलीच धडक कारवाई मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला होता. मतदारसंघातील महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या नराधमांच्या घरावर स्वतः जेसीबी चालवणार, असा शब्द त्यांनी दिला होता. या धडक कारवाईमुळे विखे पाटील यांनी गुन्हेगारांना दिलेला तो इशारा अखेर खरा करून दाखवल्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे.

राहाता शहरात घडलेल्या या विनयभंग प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत संतापजनक होती. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याला तात्काळ अटक केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने पीडित मुलीलाच दमदाटी केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला होता. याविरोधात संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संबंधित महिला अधिकाऱ्याच्या बदलीची आणि आरोपीला मदत करणाऱ्या इतरांवर कारवाईची मागणी केली होती. याचदरम्यान राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी आरोपीच्या बेकायदा बांधकामाला नोटीस बजावल्याचे स्पष्ट केले होते.

याच पार्श्वभूमीवर गुरुवारी राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासकीय यंत्रणेने चोख पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई पूर्ण केली. आरोपी गायकवाड याने तब्बल ५ ते ६ वेगवेगळ्या ठिकाणी कच्चे व पक्के बांधकाम करून मोठे अतिक्रमण केले होते. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि पोलिसांच्या मोठ्या फौजेसमोर हे सर्व बेकायदा बांधकाम अवघ्या काही वेळातच जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.

या कारवाईबाबत बोलताना राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले की, शिर्डी मतदारसंघातील महिला व मुलींची छेड काढणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईचा जो इशारा देण्यात आला होता, त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे. महिलांच्या विरोधात गैरकृत्य करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराने यापुढे या कारवाईतून योग्य तो बोध घ्यावा. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महिला सुरक्षेला प्राधान्य मिळाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आता मोठा धाक निर्माण झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या