अहमदनगर

टेक्सासमध्ये भारतीय ध्वज फाडल्याने खळबळ; 'भारतीय इमिग्रेशन' विरोधात स्थानिक नागरिकाचा तीव्र निषेध


नवी दिल्ली

टेक्सासमधील फ्रिस्को शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील शहरसभागृहासमोर एका स्थानिक नागरिकाने भारतीय ध्वज फाडल्याची घटना घडली आहे. हातातून भारतीय ध्वज हिसकावून तो फाडत असताना या व्यक्तीने "फक इंडिया" अशा अत्यंत आक्षेपार्ह घोषणा दिल्या. उत्तर डलासच्या उपनगरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या "भारतीय इमिग्रेशन आक्रमणा" विरोधात आपला रोष व्यक्त करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. कन्झर्व्हेटिव्ह इन्फ्लुएन्सर एलिजाह शॅफर यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या एक्स (ट्विटर) सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

साधारण २ लाख ४५ हजार लोकसंख्या असलेल्या फ्रिस्को शहरात गेल्या काही वर्षांत लोकसंख्येचे समीकरण वेगाने बदलले आहे. सन २००० मध्ये या भागात आशियाई म्हणजेच प्रामुख्याने भारतीय लोकांचे प्रमाण केवळ २ टक्के होते, जे २०२६ पर्यंत तब्बल ३३ टक्क्यांवर पोहोचले आहे. येथील बहुतांश भारतीय नागरिक हे आयटी क्षेत्राशी संबंधित असून ते H-1B व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत आले आहेत. या अचानक झालेल्या लोकसंख्या वाढीमुळे स्थानिक अमेरिकन नागरिकांमध्ये रोजगाराच्या वाढत्या स्पर्धा, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती, व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि सांस्कृतिक बदल या मुद्द्यांवरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या वाढत्या तणावामुळे स्थानिक शहर परिषदेच्या बैठकांमध्येही अनेकदा वादळी चर्चा आणि गंभीर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

दुसऱ्या बाजूला, स्थानिक भारतीय-अमेरिकन समुदायाने या विरोधावर आपली बाजू मांडली आहे. आपण सर्वजण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून, उच्च शिक्षण घेऊन इथे आलो आहोत आणि येथील अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात आपले मोठे योगदान आहे, असे भारतीय नागरिकांचे म्हणणे आहे. असे असले तरी, टेक्सासच्या उपनगरीय भागांमध्ये स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला सामाजिक तणाव आता अधिकच चिघळत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या