अहमदनगर

महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी यशस्वी

प्रकृती स्थिर; अहिल्यानगर येथील इंपल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू — भाविकांनी भेटीसाठी रुग्णालयात येणे टाळण्याचे आवाहन


शेवगाव  प्रतिनिधी

श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री यांना अचानक छातीत त्रास जाणवल्याने त्यांच्यावर तातडीने ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भगवानगडाच्या वतीने देण्यात आली आहे.

छातीत त्रास जाणवल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी अहिल्यानगर येथील इंपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डॉ. सुहास हरदास, डॉ. संदीप गाडे आणि डॉ. महेश घुगे यांच्या देखरेखीखाली डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर उपचार सुरू असल्याने भाविक, भक्त आणि हितचिंतकांनी रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी गर्दी करू नये, तसेच भेटीसाठी आग्रह धरू नये, असे आवाहन भगवानगडाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने सध्या त्यांना विश्रांतीची आवश्यकता असल्याने हॉस्पिटल प्रशासन अथवा संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून शास्त्रीजींना भेटण्याची विनंती करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शास्त्रीजींच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी भाविकांनी रुग्णालयात प्रत्यक्ष येण्याऐवजी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ते श्री क्षेत्र भगवानगड येथे भाविकांना भेटणार आहेत. त्यांची भेट कधी आणि कोणत्या दिवशी होणार याबाबतची तारीख त्यांच्या प्रकृतीनुसार नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी त्याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, असेही सांगण्यात आले आहे.

वैद्यकीय पथकाचे विशेष आभार

डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर तातडीने उपचार करून ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी करणारे सर्व डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासन यांच्या सेवाभावाबद्दल श्री क्षेत्र भगवानगडाचे भाविक-भक्त यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

शास्त्रीजींची प्रकृती लवकरात लवकर सुधारून ते पुन्हा भगवानगडावर भाविकांच्या सेवेत रुजू व्हावेत, यासाठी भगवानगड परिवारासह असंख्य भाविकांकडून प्रार्थना केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या