नागपूर
नागपूरमध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने बेकायदेशीर आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या 'थाई मांगुर' माशांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल १६४ टन थाई मांगुर मासे जप्त करून शास्त्रीय पद्धतीने नष्ट केले आहेत. यात केवळ दोन दिवसांत ७५ टन मासे नष्ट करण्यात आले. नागपूरच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील २७ ते ३० बेकायदेशीर तलावांमध्ये हे मासे पाळले जात होते. या बेकायदेशीर व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी मत्स्य विभागाने गुगल मॅपिंगची मदत घेऊन अचूक लोकेशन शोधले आणि डमी ग्राहक पाठवून खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानंतर २५ स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने जाळे टाकून हे मासे बाहेर काढण्यात आले. जप्त केलेले मासे ६ ते ८ फूट खोल खड्ड्यात टाकून त्यावर मीठ व ब्लीचिंग पावडर शिंपडून मातीने गाडण्यात आले असून याप्रकरणी संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. थाई मांगुर हा मांसाहारी आणि आक्रमक प्रजातीचा मासा असून तो इतर देशी मासे व जलचरांना खाऊन टाकतो, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. तसेच यांना वाढवण्यासाठी सडलेले मांस व कचरा दिला जात असल्याने यांच्या शरीरात शिसे, कॅडमियम आणि आर्सेनिकसारखे घातक धातू जमा होतात. हे मासे खाल्याने कर्करोग आणि हृदयरोग यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) आणि भारत सरकारने या माशांच्या खरेदी-विक्रीवर व पालनावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

0 टिप्पण्या