नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडींमुळे आणि जागतिक आर्थिक दबावामुळे सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, अमेरिकन डॉलरची बळकट स्थिती आणि अमेरिकन ट्रेझरी बाँडच्या उत्पन्नात झालेली वाढ या मुख्य कारणांमुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या वायदा करारासाठी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम तब्बल ३,२१४ रुपयांनी घसरून १,४७,६६७ रुपयांवर आले. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून ती ६,६६१ रुपयांनी घसरून २,२८,०३५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचे दर १.५ टक्क्यांनी घसरून ४,२२३.९५ डॉलर प्रति औंसवर आले आहेत. मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे तसेच अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षावर मुत्सद्दी मार्ग निघण्याबाबत निर्माण झालेल्या अनिच्छेमुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. तेलाचे दर वाढल्याने महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्याजदर वाढल्यास बिनव्याजी सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीचा आकर्षण कमी होते, ज्याचा थेट फटका सोन्या-चांदीच्या बाजाराला बसला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात महागाईची आकडेवारी आणि अमेरिकेच्या व्याजदराबाबत होणारे निर्णय सोन्या-चांदीच्यापुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

0 टिप्पण्या