प्रशासनाचा कानाडोळा; तहसीलदारांनी उपोषणस्थळाकडे फिरवली पाठ?
शेवगाव प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी किर्तनवाडी तालुका पाथर्डी येथे उपोषणाला बसलेले प्रल्हाद कीर्तने यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडत असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत आहे, तर दुसरीकडे प्रशासन मात्र गप्प का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. उपोषणस्थळी जाऊन प्रल्हाद कीर्तने यांच्या प्रकृतीची पाहणी करणे आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणे अपेक्षित असताना तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाच्या कथित उदासीनतेमुळे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. उपोषणकर्त्याच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे का? असा सवालही संतप्त कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रल्हाद कीर्तने यांच्या प्रकृतीची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचारांची व्यवस्था करावी, तसेच ओबीसी समाजाच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने चर्चा करून ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी प्रल्हाद कीर्तने यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यामुळे उपोषणाच्या प्रश्नाला आता राजकीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने उपोषणकर्त्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि प्रल्हाद कीर्तने यांच्या प्रकृतीबाबत काय पावले उचलते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
हजारो कार्यकर्त्यांचा उपोषणाला पाठिंबा
प्रल्हाद कीर्तने यांच्या उपोषणाला समता परिषदेचे प्रवक्ते नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, माजी नगरसेवक रमेश गोरे, शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक ज्ञानेश्वर लिंगे, शेवगाव तालुकाध्यक्ष सुरेश थोरात, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ताई ढवळे, जय भगवान जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भाऊ वाघ, राजेंद्र बनसोडे, प्रल्हाद कदम, वामन कीर्तने, विनायक कीर्तने, माजी सरपंच किसन कीर्तने, बाळासाहेब कीर्तने, सुखदेव कीर्तने, शिवनाथ कीर्तने, वैभव कीर्तने, भागवत कीर्तने, अतुल कीर्तने तसेच अल्पसंख्याक अध्यक्ष रशीदभाई तांबोळी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ठाम पाठिंबा दिला.
प्रकृती खालावत असताना प्रशासनाचा मौन; आता ओबीसी समाजाचा उद्रेक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



0 टिप्पण्या