दुबई
दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लायदुबईच्या एफझेड १०७३ या विमानामध्ये हवेत असतानाच एक अत्यंत भीषण आणि थरारक घटना घडली. उड्डाणादरम्यान सहवैमानिकाने मुख्य वैमानिकावर धारदार चाकूने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे कॉकपिटमध्ये मोठे वादळ निर्माण झाले आणि नियंत्रण सुटल्याने बोइंग ७३७ मॅक्स ८ हे विमान अवघ्या ३० सेकंदांत तब्बल १४,३०० फूट खाली कोसळले. विमानात रक्ताचा सडा पडलेला असताना आणि परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जात असताना, मूळचे मुंबईच्या घाटकोपर येथील रहिवासी असलेले कॅप्टन स्मीत मच्छार यांनी असीम धैर्य आणि शौर्य दाखवले. गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी सहवैमानिकाशी कडवी झुंज दिली आणि कॉकपिटचे दार उघडण्यात यश मिळवले.
कॉकपिटचे दार उघडताच विमानात उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी आत घुसून त्या हल्लेखोर सहवैमानिकाला पकडले आणि त्याच्यावर ताबा मिळवला. त्यानंतर विमानातील दुसऱ्या क्रू मेंबर्सच्या मदतीने विमानाचे सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर आणीबाणीच्या प्रसंगात सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या घटनेत स्मीत मच्छार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सौदी अरेबियातील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी कॅप्टन स्मीत मच्छार यांच्या या अतुलनीय धाडसाचे कौतुक केले असून, त्यांच्या प्रसंगावधानामुळे १७४ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

0 टिप्पण्या