चंपाषष्टी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
नेवासा(प्रतिनिधी)
लाखो भाविकांचे आराध्य दैवत खंडोबाराय यांची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा-म्हाळसादेवी मंदिर जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आले असून मूर्तीप्राणप्रतिष्ठापणा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास"येळकोट.. येळकोट.. जय मल्हार"च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात सोमवार दि.२५ नोव्हेंबर पासून धर्मध्वजारोहणाने प्रारंभ झाला.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चंपाषष्ठी ला दि.२ डिसेंबर रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
यावेळी झालेल्या ध्वजारोहन प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व सौ.डेरे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात येऊन अखंड हरिनाम सप्ताहाचे धर्मध्वजारोहण करण्यात आले.आलेल्या सर्व मान्यवरांचे खंडोबा म्हाळसा मंदिराचे प्रमुख प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच प्रकाश सोनटक्के, माजी सरपंच आण्णा भाऊ पेचे,प्रभाकर बोरकर,अनिल मारकळी, जयमल्हार मित्र मंडळाचे संतोष गायकवाड, सुहास जरे,
नामदेव कुटे,रावसाहेब पेचे,गोकुळ जायगुडे, महिला भजनी मंडळाच्या सौ.कमलताई कराळे,सौ.रंजनाताई भाकरे,यादव ताई यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सौ.सुनिताताई गडाख यांनी सोहळयाला भेट दिली.
गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या प्रेरणेने नेवासा बुद्रुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून चंपाषष्ठीच्या दिवशी दि.२ डिसेंबर रोजी खंडोबा म्हाळसादेवीसह सच्चिदानंद बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे त्यानिमित्त यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन,सकाळी ६ ते ७ यावेळेत विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण दुपारी १२ ते २ भोजन महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तन नंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
दि.२ डिसेंबर रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा म्हाळसादेवी व सच्चिदानंद बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.अखंड हरिनाम सप्ताहात होणाऱ्या कीर्तन कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे व नेवासा बुद्रुक ग्रामस्थ यांनी केले आहे.
0 टिप्पण्या