अहमदनगर

श्री क्षेत्र देवगड येथे श्री कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी म्हणून पंच संस्कार दीक्षा सोहळा संपन्न

शंख व वेदमंत्राचा निनाद,भगवान दत्तात्रय व सदगुरु किसनगिरी बाबांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली

ह.भ.प.कृष्णा महाराज मते यांचे महंत प्रकाशानंदगिरीम महाराज असे नामकरण - गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज


गंगापूर प्रतिनिधी | विजय बन्सोड

नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा बालसंन्यासी यांच्या कृपा आशिर्वादाने व सनातन वैदिक हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे श्री कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा शुक्रवारी दि.६ मे रोजी संत महंतांच्या उपस्थितीत व वेदमंत्राच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.शंख चौघडा सनईच्या निनादासह भगवान दत्तात्रय व सदगुरु किसनगिरी बाबांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती.ह.भ.प. कृष्णा महाराज मते यांचे यापुढे महंत प्रकाशानंदगिरी महाराज असे नामकरण झाले असल्याचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना जाहीर केले.

श्री क्षेत्र देवगड दत्तपिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांच्या उपस्थितीत यज्ञ मंडपामध्ये होम हवनाधी नामकरण विधी वेदमंत्राच्या जयघोषात पार पडला. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य त्रिंबकेश्वर येथील शास्त्री महाराज गुरुजी,नेवासा तालुक्यातील भेंडे ज्ञानेश्वरनगर येथील वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांच्यासह उपस्थित ब्रम्हवृंद मंडळींनी केले.यावेळी उपस्थित संत महंतांची भक्त निवास पासून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संत महंतांच्या उपस्थितीत हभप कृष्णा महाराज मते यांना संन्यास दीक्षा देण्यात आली.

यावेळी झालेल्या उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळयाच्या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मंजूर येथील श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर महाराष्ट्र पिठाधीश्वर महान तपस्वी शिवानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील महंत देवेंद्रगिरी महाराज,महंत वेदव्यासपुरी महाराज,

गिरनार मंडलाचे अध्यक्ष महंत इंद्रजीत भारतीजी महाराज,महंत इंद्रभारती महाराज,महंत विश्वंभर गिरी महाराज,महंत हरिहरानंद महाराज,महंत यशोदापुरी माताजी,महंत कृष्णागिरी महाराज,महंत विष्णुपादानंद महाराज,आनंदचैतन्य महाराज,शांतिब्रम्ह मारुतीबाबा कु-हेकर,हभप मुखेकर शास्त्री,हभप तुकाराम महाराज, प.पू.शंकरजी गुरुजी,प.पू.गोपालबुवा महाराज,हभप रामराव महाराज,हभप सुधाकर महाराज,प.पू.माधव महाराज,विश्वहिंदू परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख,सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे हभप उद्धव महाराज मंडलिक,महंत सुनिलगिरी महाराज, महंत गोपालानंदगिरीजी महाराज विदर्भ अकोला येथील हभप नाना महाराज उजवणे,महंत ऋषीनाथजी महाराज,हभप रामभाऊ महाराज राऊत, विहिपचे केंद्रीय सदस्य संजय अप्पा बारगजे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की पन्नास वर्षे अगोदर याठिकाणी चोरांना ही भीती वाटेल असे निर्जन ठिकाण होते मात्र सदगुरू किसनगिरी बाबांना भगवान दत्तात्रेयांचा आशिर्वाद याठिकाणी मिळाला,भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी येथे भगवान दत्तात्रयांची स्थापना केली.राष्ट्र धर्म समाजाच्या उद्धाराकरिता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कार्य केले त्यांनी दिलेल्या संदेशाचे पालन करत हा गाडा आम्ही ओढत आणला त्यांचे कार्य असेच चालत राहो,जसे मला प्रेम दिले तसेच प्रेम देखील उत्तराधिकारी झालेल्या महंत प्रकाशानंदगिरी महाराजांवर करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी बोलतांना कृष्णा महाराज मते उर्फ महंत प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की धर्माची वैश्विक जबाबदारी गुरुवर्य बाबांनी आमच्यावर टाकलेली आहे.बाबांनी आम्हाला उत्तराधिकारी बनवले मात्र उत्तर सेवेकरी म्हणून काम करणार आहे.भक्तीने ओतप्रोत असे देवगड संस्थान आहे हे संस्थान आपण निरपेक्ष वृत्तीने व निष्ठेने व श्रद्धेने चालवू यासाठी सर्वांच्या प्रेमाची व सहकार्याची आम्हाला गरज असून ती साथ आम्हाला द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी वेदव्यासमुनी महाराज,महंत शिवानंदगिरी महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले.देश व राज्यभरातून आलेल्या संतांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन संतसेवक बजरंग विधाते यांनी केले.तर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार सदाशिव लोखंडे,माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डीले, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे,युवा नेते उदयनदादा गडाख, सभापती सौ. वंदनाताई मुरकुटे माजी आमदार अण्णासाहेब माने, नगरसेवक प्रदिप पाटील, राष्ट्रवादीचे संतोष माने यांच्या हस्ते गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग विधाते यांनी केले.शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली उपस्थित हजारो भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


भास्कर म्हणजे सूर्य... वारकरी संप्रदायात गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज हे ज्ञान रुपी सूर्य असून देवगडचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या कृष्णा महाराज मते यांचे कार्य या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रखर व्हावे असाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे नामकरण प्रकाशानंदगिरी महाराज असे करण्यात आले असा उल्लेख संतसेवक बजरंग विधाते यांनी सूत्रसंचालनच्या माध्यमातून करताच टाळयाची एकच लहर उसळली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या