अहमदनगर

बोधेगाव येथे रहस्यमय मृत्यू : जिओ कार्यालयासमोर आढळला युवकाचा मृतदेह



बोधेगाव प्रतिनिधी

तालुक्यातील बोधेगाव येथे आज सकाळी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर जिओ कंपनीच्या कार्यालयासमोर एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख कैलास काकासाहेब काकडे (वय ३५, रा. कांबी, ता. शेवगाव) अशी झाली आहे.

अचानक मृतदेह सापडल्याने खळबळ

ही घटना अकस्मात मृत्यू की घातपात याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. सकाळीच मृतदेह आढळून आल्यावर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह अहिल्यानगर येथे उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला.

कालपासून बेपत्ता होता युवक

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास काकडे हे गुरुवारी पत्नीसह खाजगी बँकेत कर्ज प्रकरणासाठी बोधेगाव येथे आले होते. दुपारनंतर त्यांनी पत्नीला "मी बाहेर जाऊन येतो" असे सांगून बाहेर गेले. मात्र, ते पुन्हा परतलेच नाहीत. संध्याकाळपर्यंत काहीही संपर्क न झाल्याने पत्नी गावी परत गेली. रात्रीदेखील कैलास घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली होती.

मारहाणीच्या खुणा; संशय वाढतोय

मृतदेह जिओ कार्यालयासमोर सापडल्यावर, त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही घटना घातपाताचा भाग असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तपासासाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

मयत कैलास काकडे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस तपास सुरु असून, सत्य उघडकीस येण्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या