अहमदनगर

मनुष्य गौरव दिनाच्या उत्सवाची तीर्थयात्रेने पूर्णाहूती


गंगापूर प्रतिनिधी - विजय बन्सोड

पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित वैश्विक स्वाध्याय परिवार १९ ऑक्टोबर हा दादांचा जन्मदिन मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतो. मनुष्य गौरव दिनाचा उत्सव कृतिपूर्ण रीतीने साजरा करण्यासाठी १३ ते १९ ऑक्टोबर या काळात औरंगाबाद जिल्हातील जवळपास  साडेपाच हजार स्वाध्यायी आपला तालुका सोडून जिल्ह्यातल्या दुस-या तालुक्यात जाऊन निरपेक्ष आणि निःस्वार्थपणे लाखो लोकांना भेटत आहेत. सहा दिवस अशी भक्तीफेरी करून १९ तारखेला वैजापूर शहराजवळ श्री देवी दाक्षायणी तीर्थक्षेत्राच्या नावाने एकत्र येत ही तीर्थयात्रा पूर्ण होत आहे.

कृतिशील तत्त्वचिंतक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित वैश्विक स्वाध्याय परिवार १९ ऑक्टोबर हा दादांचा जन्मदिन मनुष्य गौरव दिन म्हणून गेली कित्येक वर्षे साजरा करत आहे. खरेतर २०१९-२०२० हे पांडुरंगशास्त्रींचे जन्मशताब्दी वर्ष, परंतु मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे,सगळे जगच ठप्प झाले. त्यामुळे दादांचे हे जन्मशताब्दी वर्ष, अत्यधिक उत्साह असूनही कुठल्याही कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन होता कामा नये म्हणून स्वाध्याय परिवाराला २०२० किंवा २०२१ साली मोठ्या प्रमाणावर साजरे करता आले नाही. २०२२ या वर्षी १९ ऑक्टोबर रोजी दादांना कृतिपूर्ण नमस्कार करून त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार साजरा करणार आहे. यावर्षी दिनांक १३ ते १९ ऑक्टोबर या काळात देशभरातील १६ राज्यांतील अनेक जिल्ह्यांतून जवळपास दीड लाख स्वाध्यायी आपला तालुका सोडून जिल्ह्यातल्या दुस-या तालुक्यात जाऊन निरपेक्ष आणि निःस्वार्थ पणे लाखो लोकांना भेटणार आहेत. सहा दिवस अशी भक्तीफेरी करून १९ तारखेला जिल्ह्यातील एका तीर्थक्षेत्रीं एकत्र येणार आहेत. स्वाध्यायींची ही खऱ्या अर्थाने 'तीर्थयात्रा' असेल. केवळ रिटर्न तिकिट काढून देवदर्शनाची इतर सहलींप्रमाणेच सहल म्हणजे तीर्थयात्रा नव्हे तर असा देवासाठी वेळ काढून, देवाच्या लेकरांना निरपेक्षपणे भेटून, विचार आणि उबारा यांची देव-घेव करून मग तीर्थक्षेत्रावर एकत्र येणे ही खरी तीर्थयात्रा असं दादा म्हणत. दादा नेहमी म्हणायचे की एखाद्या तीर्थक्षेत्रावरील मंदिरात देवाला भेटायला जायचे मग आपण जिथे आहोत तिथे सैतानाचे राज्य आहे की काय? केवळ ट्रिप म्हणून देवदर्शनाला जाणे म्हणजे तीर्थयात्रा होऊच शकत नाही. अशी एक क्रांतिकारी 'तीर्थयात्रा' दादांचे लाखो स्वाध्यायी करणार आहेत. ते ही दिवाळीच्या आदल्या आठवड्यात, जेव्हा सर्वसामान्य घरांतून फक्त खरेदी, बाहेर फिरायला जायची तयारी असाच एकंदरीत माहोल असतो. पण दादांचा स्वाध्याय परिवार पण दादांसारखाच वेगळा आहे.

आपल्या देशांत एखाद्या महापुरुषाची जयंती व्याख्यान, समारंभ, कविता-गाणी, गौरव करणारी भाषणे, आदरांजली वाहाणे आणि सुट्टी यापलीकडे फारशी वेगळ्या प्रकारे साजरी होत नाही. परंतु पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासारख्या एका अजोड कृतिशूर तत्त्वचिंतकांची जयंती कृतिपूर्ण रीतीने न साजरी झाली तरच नवल. स्वाध्याय परिवारातील सदस्य १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या काळात वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधतील, पण त्यात कुणाचाही आविर्भाव आपण कोणी धर्मसुधारक ,समाजसुधारक किंवा परिवर्तनवादी कार्यकर्ते असा नसून फक्त निरपेक्ष, निःस्वार्थपणे सर्वांना भेटणे आणि त्यातून एक ईश्वराधिष्ठित तरल भावसंबंध बांधण्याचा प्रयत्न करणे हा एक भक्तियुक्त हेतु असेल. दादांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवाराच्या सांप्रत प्रमुख श्रीमती धनश्रीदीदी तळवलकर म्हणजेच दीदींच्या मार्गदर्शनाखाली स्वाध्यायींचा हा आगळावेगळा प्रयोग तसेच स्वाध्याय परिवाराचे रचनात्मक कार्य अव्याहतपणे चालू आहे.  

वस्तुतः मनुष्य गौरवाचा विचार हे दादांचे एक प्रचंड मोठे योगदान आहे. दादा नेहमी पोटतिडकीने म्हणत की माणूस आत्मगौरवरहित का? माणूस विकला का जातो? कितीही मोठा माणूस का असेना, आज तो विकत घेऊ शकणारी वस्तू बनला आहे (purchasable commodity). आज दुर्दैवाने समाजात ज्याच्याकडे वित्त आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ति आहे त्यालाच किंमत मिळते. पण यातले काहीही नसेल तर माणसाला किंमतच नाही का? आज समाजातील ९०% पेक्षा जास्त लोकांकडे विद्या, वित्त, सत्ता, कीर्ति यातील काहीच नाही व ते नसल्यामुळे जर त्यांना किंमतच मिळणार नसेल, गौरव प्राप्त होणार नसेल, त्यांचा कणा ताठ होणारच नसेल, ते स्वतःला हलकाच समजणार असतील तर आपण कसल्या विकासाच्या आणि सुधारणेच्या वल्गना करत आहोत? तुझ्यात राम आहे आणि त्याला तुझी गरज आहे म्हणून तो रोज तुला उठवतोय, चालवतोय हा गौरव ज्यांनी अक्षरशः लाखों लोकांत मूर्तिमंत जागृत केला त्या पांडुरंगशास्त्रींना मनुष्य गौरव दिनानिमित्त भावपूर्ण वंदन !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या