शेवगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी वारकरी सांप्रदायाला दिशादर्शक असणारे संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ भावानुवाद लिखाणाचे महत्वपूर्ण काम हाती घेतलेले आहे. त्यापैकी दुसऱ्या अध्यायाच्या भावानुवाद ई-बुक ग्रंथाचे आज श्री क्षेत्र भगवानगड येथून लोकार्पण झाले आहे. न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार असून त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत झाले. त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या न्यायशास्त्राचं शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज द्वादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदिवली मुंबई येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्षे शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापिठाची 'न्यायाचार्य' ही पदवी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातुन एम ए(मराठी) करून 'वारकरी संतांची कुटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पि एच् डी संपादन केली. श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी वै.गुरुवर्य श्री संत भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर १० नोव्हेंबर २००३ पासून श्री क्षेत्र भगवानगडाच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून ते भगवानगडाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन-अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत. त्यांचे किर्तन व प्रवचन ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असून यात मानसिक समस्येचे समाधान आहे. वै.श्री संत भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी गडावरील मंदिराचा मोठा विकास केला आहे. आळंदी, पंढरपूर, पैठण व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भगवानगडाचे मोठे मठ त्यांनी ऊभारले आहेत. तसेच श्री क्षेत्र भगवानगड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भव्य दगडी मंदिर उभारण्यात येत असुन वारकरी शिक्षण देणारे ज्ञानेश्वरी विद्यापीठ २००४ साली स्थापन करून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू आहे. भाविकांना कीर्तन व प्रवचन ऐकण्यासाठी त्यांचे "नामदेव शास्त्री ऑफिशियल" व "आनंदाचे सिद्धांत" हे दोन चॅनेल समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा लिखित ज्ञानेश्वरी भावानुवाद अध्याय पहिला व दुसरा या दोन्ही अध्यायांची पीडीएफ फाईल आपल्या मोबाईलवर हवी असल्यास ९७६४९३१००८ या नंबरवर संपर्क करावा.
0 टिप्पण्या