बोधेगाव, प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील हातगाव येथे शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विजेचा शॉक लागून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेतकरी बाळासाहेब राधाकृष्ण आहेर यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ऐन शेतीच्या कामाच्या हंगामात मोठा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या गट कार्यालयाजवळील चौकात रस्त्यालगत असलेल्या विजेच्या पोलवर अर्थिंगच्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. त्याच वेळेस बाळासाहेब आहेर आपल्या बैलांसह जनावरे चारण्यासाठी नेत होते. गावठाणाचा वीजपुरवठा सुरू असल्यामुळे, अर्थिंगच्या तारेचा बैलांना स्पर्श झाल्याने दोन्हीही बैल शॉक लागून जागीच ठार झाले.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. याच परिसरातून पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, विजेचे पोल हलवण्याच्या कामामुळे अर्थिंगच्या तारा खाली आणल्या होत्या. दुर्दैवाने त्या तारांवरच वीज प्रवाह उतरल्याने हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच तलाठी भारत भुक्कन, ग्रामसेवक संजय दारुणकर, ३३ केव्ही उपकेंद्राचे सहायक अभियंता दिनेश माळी, लाईनमन प्रवीण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र लाड यांनी दोन्ही बैलांचे शवविच्छेदन केले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृत बैलांची एकत्रित किंमत सुमारे ९० हजार रुपये असून, नुकसानीमुळे शेतीची मशागत, नांगरणी आदी कामांवर थेट परिणाम होणार आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 टिप्पण्या