अहमदनगर

शेवगावात कुस्ती संकुल उद्घाटन वादग्रस्त, बावनकुळे यांचे चॅम्पियन खेळाडू घडवण्याचे आवाहन


शेवगाव

राज्य सरकारने प्रत्येक गावात चॅम्पियन खेळाडू घडवण्यासाठी नवे क्रीडा धोरण हाती घेतले आहे. यासाठी जनतेने पुढाकार घेऊन चांगले पहिलवान तयार करावेत, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवगावात व्यक्त केले. जिल्हा तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'देवा भाऊ' जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा आणि जिम व कुस्ती संकुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, जिम आणि कुस्ती संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरल्याने अखेर टाळण्यात आला.


या कार्यक्रमास बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि विधानसभेचे सभापती राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बावनकुळे यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने राज्यातील २७ हजार ग्रामपंचायती आणि नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डात एक चॅम्पियन खेळाडू तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील ५ वर्षांत शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी, वीज, आणि पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



याशिवाय, अहमदनगर जिल्ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि राम शिंदे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे कॅबिनेट घेऊन १० हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तसेच, ३ वर्षांनंतर शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा मोफत मिळेल, असेही त्यांनी जाहीर केले.



बावनकुळे यांनी वंदे मातरम तालीम संघाचे अध्यक्ष अरुण मुंढे यांनी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याचे कौतुक केले. तसेच, आमदार मोनिका राजळे यांनी गेल्या १० वर्षांत मतदारसंघात भरीव काम केल्याचे सांगितले. जिम आणि क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न चर्चेने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुस्ती स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. राम शिंदे यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धा आता राज्यस्तरीय झाल्याचे नमूद करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण मुंढे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, माजी जि.प. सदस्य अर्जुन शिरसाट, भैय्या गंधे, कमलेश गांधी, नंदू मुंढे, माजी भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, पुरांगे, वैभव लांडगे, रामनाथ राजपुरे यांच्यासह राज्यभरातील मल्ल उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले.

राजळे अनुपस्थित, ढाकणे उपस्थित, चर्चांना उधाण

या कार्यक्रमात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. तरीही बावनकुळे यांनी त्यांचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


चेतन रेपाळे : देवाभाऊ केसरी विजेता

कौतुक  डाफळे : उपविजेता

विजय पवार : तृतीय

---------

निमंत्रित कुस्त्या विजेते

शिवराज राक्षे 

हर्षवर्धन सदगिर

सोनाली मंडलिक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या