बोधेगाव प्रतिनिधी
वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण मिळावे आणि हैद्राबाद, कर्नाटक तसेच बीड गॅझेट तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी थाटे वाडगाव (ता. शेवगाव) येथे पुकारलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आहे. प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, येत्या मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य भगवान सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
१ ऑक्टोबर २०२५ पासून परमेश्वर जालिंदर केदार, अभिजित अजिनाथ गिते आणि युवराज नवनाथ जवरे यांनी वाडगाव (थाटे) येथे हे उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रशासनाने कोणतीही गंभीर दखल न घेतल्याने समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी बोधेगाव येथील राज्यमार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
या आहेत प्रमुख मागण्या
- वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.
- वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून शासनाने स्वतंत्र समिती नेमून कार्यवाही करावी.
- हैद्राबाद, कर्नाटक व बीड गॅझेट त्वरित लागू करून समाजाला सरसकट अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा.
यावेळी बैठकीत भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे, राजेंद्र दौंड, गोकुळ दौंड, संजय आंधळे, प्रा. सुशीला मोराळे, महादेव दहिफळे, दीपक बटुळे, अर्जुन धायतडक, केदारेश्वराचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, ॲड. जयंत राख, आघाव आणि बाळासाहेब सानप यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. तसेच, राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्रित संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महादेव दराडे, नंदू मुंढे, बाळासाहेब शिरसाट, गजानन ढाकणे, रामभाऊ साळवे, भाऊ वाघमारे यांच्यासह राज्यभरातून समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या